नाणेघाट ट्रेक

नाणेघाट

‌सरसगड झाल्यावर 2 आठवडे ट्रेक केला नसल्यामुळे जशी वारकऱ्यांची पावले पंढरीकडे वळतात तशीच आम्हा ट्रेकर्सची पावले सह्याद्रीकडे वळतात म्हणून ह्या वेळेला नाणेघाटात जायचे ठरवले. उन्हाळा असल्यामुळे सकाळी पाचलाच निघालो. ट्रेकचा साथीदार मेहुल ऐरोली वरुन येऊन थांबलेला मग आम्ही नाष्टा करून सकाळी साडे पाचची कल्याण वरुन अहमदनगरला जाणारी बस पकडली. आम्हाला
टोकावडेला उतरायचे होते पण मी आळे फाटयाचे तिकीट काढले. मी उत्सुकता म्हणून गूगल मॅप्स काढले आणि झालेला गोंधळ लक्षात आला नाहीतर ट्रेक झालाच नसता कारण आळे फाटा नाणेघाटावरुन ६१ किमी दूर आहे मग आम्ही टोकावडेला  उतरलो. टोकावडेहून नाणेघाट ५ किमी वर आहे पण आम्हाला लिफ्ट मिळाली म्हणून पुढचे कष्ट वाचले. मग आम्ही नाणेघाटाच्या starting point ला पोहोचलो



ट्रेक ला  सुरवात करताना उन्हाळा आहे असे वाटलेच नाही कारण सगळीकडे गारवा  होता. वनखात्याने सगळीकडे markings करून ठेवल्याने कुठेही चुकण्याचा प्रश्नच येत नाही. दाट झाडीतून जाताना बरे वाटत होते. सकाळची वेळ असल्याने वातावरण सुद्धा आल्हाददायक होते.  मग क्लीकक्लीकाटाला सुरवात झाली.  क्लीकक्लीकाट झाला आणि पुढे जाण्यास मार्गस्थ झालो. ब्रेक घेणे सुरु होते मग नानाच्या अंगठ्याचे दर्शन झाले.
 


दोन तासाच्या वाटचालीनंतर आम्ही गुहेकडे पोहोचलो. गुहेमध्ये शिलालेख आहे तो सातवाहनकालीन शिलालेख असावा कारण नाणेघाट हा पुरातन काळापासून वापरात असलेला एकमेव मार्ग होता व्यापारासाठी मग गुहेत थोडावेळ आराम करून पुढे चालू लागलो. पुढे एक रांजण आहे त्याचा उपयोग जकात गोळा करण्यासाठी होत असावा. याच्या बाजूलाच सुरेख गणपतीचे मंदिर आहे त्याचे दर्शन घेतले. थोडे पुढे गेल्यावर जीवधन किल्ल्याचे सुद्धा दर्शन झाले. आम्ही त्या दिवशीच जीवधन किल्ला सुद्धा करणार होतो पण जीवधन  किल्ला करण्यासाठी ३-४ तास लागले असते आणि उन्हाळा असल्यामुळे आम्ही तो बेत रद्द केला पण लवकरच जीवधन किल्ला करू असे मनाशी पक्के केले.







थोडासा आराम केला आणि तिथल्याच एका दादाला जेवणाची ऑर्डर देऊन तिथेच जेवण करून घरी येण्यास निघालो.
नाणेघाटाचा इतिहास :
नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला. प्रतिष्ठान (पैठण) ही सातवाहनांची राजधानी होती. सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान या राजमार्गावर जुन्नर जवळ डोंगर फोडून नाणेघाटाची निर्मिती केली गेली. सातवाहन कुल हे महाराष्ट्रातील प्राचीन असे कुल आहे आणि त्र्‍यांचे राज्य इ.स पूर्व २५० ते इ.स नंतर २५० असे जवळजवळ पाचशे वर्ष होते. प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये उतरणारा माल व्यापारी घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत. हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई. नाणेघाटाचा वापर केल्याबद्द्ल या व्यापार्‍र्‍यांकडून जकात जमा केली जात असे. त्या जकातीचा दगडी रांजण आजही नाणेघाटात पाहावयास मिळतो.(माहिती साभार : सदर माहिती ही ट्रेक क्षितिज संस्थेच्या वेबसाइट वरून घेण्यात आलेली आहे.)


नोंदी:
सह्याद्री हा अत्यंत संवेदनशील भाग आहे त्याची काळजी घेणे हे आपले पहिले कर्तव्य आहेगड किल्ल्यांवर फिरताना कचरा करू नये आणि कुठेही नावे लिहू नये.
ट्रेकचा खर्चएकूण २००-२५० रुपये खर्च होईल
उन्हाळ्यात ट्रेक करत असल्यास सोबत इलेकट्रॉल जरूर बाळगावे.
कोणताही ट्रेक करण्यापूर्वी गूगल मॅपवर तो प्रदेश ऑफलाईन डाउनलोड करावा आणि स्थानिक लोकांचा फोन नंबर पण घेऊन ठेवावा.

Comments