सरसगड ट्रेक
सरसगड
गोरखगडाचा ट्रेक झाल्यावर २-३ आठवडे ट्रेक न केल्यामुळे जसा माणूस पाण्याशिवाय राहु शकत नाही तसा खरा भटका ट्रेक शिवाय नाही राहू शकत म्हणून ट्रेक करायचे ठरवले. पहिले मी ढाकचा ट्रेक करायचे ठरवले पण कोणी नसल्यामुळे मी तो ट्रेक रद्द केला मग दूधाची तहान ताकावर भागवली आणि सुधागडचा ट्रेक करायचे ठरवले. बरोबर सुरज आणि रविन्द्र पण होते. सकाळची पहिली कर्जत लोकल पकडून बदलापूरला जाऊन थांबलो तिकडे सुरज आणि रविन्द्र भेटले. मग ते दोघे भेटल्यावर खोपोली गाडी पकडली. खोपोलीला गेल्यावर नाष्टा करण्याच्या नादात बस गेली. मग परत कसरत सुरु. खोपोली फाटयापर्यंत टमटम केली. खोपोली फाटयावरुन परळीपर्यंत टमटम केली. परत परळीवरुन पाली पर्यंत टमटम केली.असा सगळा द्रविडी प्राणायाम केल्यावर शेवटी एकदाचे पालीला पोहोचलो. श्री क्षेत्र पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक क्षेत्रांपैकी एक आहे. पाली बस स्थानकात प्रवेश केल्या सरसगडाचे दर्शन होते. मग आम्ही धोंडसे गावात जाणाऱ्या बसची वाट बघत बसलो पण बस अर्धा तास थाम्बूनसुद्धा न आल्याने आम्ही सरसगडावर जायचा निर्णय घेतला.सरसगडावर जायचे असल्यास पाली बल्लाळेश्वरच्या बाजूने एक रस्ता जातो तिथे बाजूला एक तळे आहे. तळयाच्या समोर एक फलक लावलेला आहे तिथूनच सरसगडाचा ट्रेक सुरु होतो. आम्ही सुरवातीलाच वाट चुकलो आणि घसाऱ्याच्या वाटेला लागलो आणि त्यात गावकर्यांनी आदल्या दिवशी वणवा केल्यामुळे माती भुसभूषित होती. मग तो घसारा पार करून पठारावर आलो मग आम्हाला समजले की आम्ही कोणत्या वाटेने आलो आहोत. तसेच उन जास्त असल्याने थोडी विश्रांती घेतली आणि फोटो सेशन केले.
मग पुढे जाण्यास मार्गस्थ झालो. चढाई जास्त दमछाक करणारी नसल्याने फटाफट चढू लागलो. पुढची चढाई ही कातळात आहे पण सोपी आहे. कातळात पुढे गेल्यावर गुहा लागली. गुहेचा उपयोग कदाचित पाणी साठवन्यासाठी असेल कारण पाण्याचा निचरा बाष्पीभवनामुळे होऊ नये म्हणून पूर्वीच्या काळी अश्या गुहा खोदायचे. गुहेच्या पुढे गेल्यावर दोन कातळ कडे आहेत त्यामध्ये १०० पायऱ्या खोदल्या आहेत त्या पायऱ्या चढून गेल्यावर समोरच दिंडी दरवाजा लागतो. दिंडी दरवाजातून प्रवेश केल्यावर समोरच पहारेकऱ्यांच्या देवडया आहेत त्याची रचना सुंदर आहे एक माणूस पाचशे माणसांना भारी पडेल अशी त्याची रचना आहे आणि दिंडी दरवाज्याला दोन बुरुजांची भक्कम अशी तटबंदी अजूनही शाबूत आहे.
आम्ही थोडा वेळ विश्रांति घेतली आणि पुढील चढाईला सुरवात केली. बालेकिल्ल्यावर जाण्याआधी कातळात खोदलेली पाण्याची टाकी आहेत तिथूनच पुढे बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी खडी चढण सुरु होते ती चढाई काळजीपूर्वक केल्यास सोपी आहे. मग आम्ही बालेकिल्ल्यावर प्रवेश केला. बालेकिल्ल्यावर शहापीराचे थडगे आहे आणि त्याच्या पुढे केदारेश्वराचे मंदिर आहे आणि पाण्याचे मोठे तळे आहे. मंदिरात काही पुरातन अवशेष आहेत.बालेकिल्ल्याला पण दोन बुरुजांची भक्कम अशी तटबंदी आहे. सरसगडावररून सुधागड,तैलबैला,घनगड आणि कोरीगडाचे दर्शन होते. केदारेश्वर मंदिरात थोडी विश्रांती घेऊन आम्ही उतराईला सुरवात केली. उतराईला दूसरा कोणता मार्ग आहे का हे बघत होतो पण जो मार्ग मिळाला तो वळसा घालून परत मंदिरापाशीच आला. आमचा पोपट झाला. मग आम्ही आहे त्या मार्गाने उतराईला सुरवात केली. उतराई आम्ही कुठेही विश्रांती न घेता केल्याने एका तासात आम्ही पाली गावात पोहोचलो. मग पाली गावातून आम्ही खोपोलीला बस पकडली आणि तिथून मुम्बईला जाणारी लोकल पकडून घरी पोचलो. अशाप्रकारे आमचा सरसगड ट्रेक पूर्ण झाला.
नोंदी:
१. सह्याद्री हा अत्यंत संवेदनशील भाग आहे त्याची काळजी घेणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. गड किल्ल्यांवर फिरताना कचरा करू नये आणि कुठेही नावे लिहू नये.
२. ट्रेकचा खर्च: खोपोलीवरून पालीला जाण्यास एकूण ५० रुपये खर्च आहे आणि पालीवरून खोपोलीला येण्याससुद्धा ५० रुपये खर्च आहे. १०० रुपयात ट्रेक होतो.
३. उन्हाळ्यात ट्रेक करत असल्यास सोबत इलेकट्रॉल जरूर बाळगावे.
४. कोणताही ट्रेक करण्यापूर्वी गूगल मॅपवर तो प्रदेश ऑफलाईन डाउनलोड करावा आणि स्थानिक लोकांचा फोन नंबर पण घेऊन ठेवावा.




















Comments
Post a Comment